कर्मयोगी सिद्धविनायक उपाख्य तात्यासाहेब बोंद्रे हे एक व्यासंगी, आध्यात्मिक, सेवाभावी व्यक्तिमत्त्व होते. शेती, सहकार, शिक्षण, राजकारण आणि अध्यात्म या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करुन त्यांनी आपला अमीट ठसा उमटविला होता. शेतकर्यांच्या कल्याणासाठी सहकारी सूतगिरणी सुरु करुन ती त्यांनी चांगल्याप्रमारे चालवून दाखविली. बदलत्या कालमानानुसार विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांनी अभियांत्रिकी आणि फार्मसीचे शिक्षण देणारी महाविद्यालये सुरु केली. संतसाहित्याचे चिंतन, धार्मिक उत्सवांचे आयोजन, योगी पुरुषांच्या स्मारकांची उभारणी, ग्रंथ परिशीलन आणि आध्यात्मिक पर्यटन ही त्यांच्या जीवनसाधनेची महत्त्वाची अंगे होती. वाल्मिकी रामायणाचा सखोल व्यासंग करुन त्यांनी ‘तत्त्वबोध रामायण’ हा ग्रंथ प्रकाशित केला. ‘प्रवचनकार’ म्हणून त्यांचा वारकरी संप्रदायामध्ये चांगला नावलौकिक होता. नेटका प्रपंच करुन परमार्थ करावा, असे ते आवर्जून सांगत. विहित कर्म करणे हीच खरी ईश्वराची पूजा आहे, अशी त्यांची शिकवण होती. ईश्वरार्पण बुद्धीने अंगीकृत कार्य करणे हाच खरा कर्मयोग आहे, असा ते उपदेश करीत. आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात समन्वय साधण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. ते श्रोत्यांना आपल्या प्रवचनातून प्रपंचाकडून परमार्थाकडे, दैववादाकडून कर्मयोगाकडे जाण्याचा मौलिक संदेश देत असत. त्यांचा ‘... आलो याचि कारणासी’ हा प्रवचन संग्रह आवर्जून संग्रही ठेवावा, इतका मौलिक आणि उपयुक्त आहे. - डॉ. एस. एम. कानडजे अध्यक्ष, मातृभाषा प्रतिष्ठान, बुलढाणा
Pickup available at HO
Usually ready in 24 hours