मृदा ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती असून, ती मानवाच्या अस्तित्वाचा, अन्नसुरक्षेचा, जैवविविधतेचा आणि पर्यावरणीय संतुलनाचा मूलभूत आधार आहे. पृथ्वीवरील सर्व स्थलजीवांच्या जीवनचक्रात मृदेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कृषी उत्पादन, वनसंपदा, जलसंधारण, कार्बन संचयन, जैवविविधतेचे संवर्धन, तसेच परिसंस्थेचे संतुलन राखण्यामध्ये मृदा ही एक अमूल्य नैसर्गिक संसाधन म्हणून कार्य करते. म्हणूनच मृदेचा अभ्यास हा केवळ कृषिशास्रापुरता मर्यादित नसून, भूगोल, पर्यावरणशास्र, भूविज्ञान, जीवशास्र, जलव्यवस्थापन, हवामानशास्र आणि शाश्वत विकास या विविध शाखांशी घनिष्ठपणे संबंधित आहे. प्रस्तुत पुस्तकात मृदेचा अर्थ आणि व्याख्या, मृदा भूगोलाची व्याख्या, मृदा भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती, मृदा अभ्यासाचे महत्त्व यांचा सविस्तर परिचय करून देण्यात आला असून, मृदानिर्मितीची संकल्पना, मृदानिर्मितीच्या प्रक्रिया, मृदानिर्मितीवर परिणाम करणारे मूळ खडक, हवामान, स्थलाकृती, सजीव, काल आणि मानवी हस्तक्षेप हे घटक, मृदेची रचना , तसेच मृदेचा छेद आणि त्यातील विविध स्तर यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. तसेच मृदा र्हासाची संकल्पना, व्याख्या, प्रकार, कारणे व परिणाम, मृदासंवर्धनाची व्याख्या व आवश्यकता, मृदासंवर्धनाच्या विविध पद्धती, तसेच मृदासंवर्धनात दूरसंवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणालीयांची भूमिका यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. प्रस्तुत प्रकरण विद्यार्थ्यांना मृदा संसाधनांच्या संरक्षणाचे महत्त्व समजून घेण्यास, एकूणच अभ्यासकाना सदरील पुस्तक शाश्वत विकासाच्या दृष्टीने मृदा व्यवस्थापनाची आवश्यकता ओळखण्यास उपयुक्त ठरेल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours