जगण्याचे विविध पदर उलगडून दाखवणार्या कथा फिरो घाणा निरंतर. अशोक निलकंठ सोनवणे यांच्या ‘फिरो घाणा निरंतर’ या कथासंग्रहास पाठराखण लिहितांना मला अतिशय आनंद होत आहे. कथा या साहित्य प्रकाराचे भारतीय मनाला खूप आकर्षण आहे. माणसाचे आयुष्य साधे, सोपे आणि सरळ कधीच नसते. पदरात पडलेले दान स्विकारूनही अनपेक्षितपणे काहीतरी घडते. माणसाच्या जगण्यातील अशा गुंत्यांना आपल्या कथते गुंफण्याचे काम अशोक सोनवणे यांनी केले आहे. “फिरो घाणा निरंतर” हे कथासंग्रहाचे शीर्षकही खूप काही सांगणारे आहे. आयुष्याचे चक्र /घाणा असाच कायम फिरत राहणार आहे. तुमची इच्छा असो वा नसो नियती/दैव हा घाणा सुरुच ठेवणार आहे. अशा आशयाच्या कथा या संग्रहात आहेत. चांगुलपणावरचा विश्वास - देहमनाचे सूर न जुळणे, जवळची माणसे न उमजणे, वाईट घटनेचे पायगुण म्हणून खापर फोडणे हे विषय हाताळणार्या सोनवणे यांनी अपेक्षाभंगातून निर्माण झालेल्या दोन धमाल विनोदी कथाही लिहिल्या आहेत. कथा लिहितांना कथाद्रव्य आणि कलाद्रव्य या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लेखकाकडे नुसते कथाबीज असून चालत नाही. त्या बीजाचे कथेत रुपांतर करण्यासाठी कलाद्रव्य लागते. सोनवणे यांच्या कथांमध्ये दोन्ही गोष्टी दिसून येतात. कथाकार स्वतःच्या नजरेने समाजाकडे पाहत असाते आणि समाजाच्या नजरेनेही स्वतःकडे पाहत असाते. त्यातून त्याचे कथाविश्व बहरत जाते. कथा चार ओळींची आहे की चार हजार शब्दांची, यापेक्षा ती कोणता जीवनाशय मांडते, यावर कथेचे मोल ठरत असते. कथा म्हणजे गोष्ट नसते किंवा तो लेखकाला आलेल्या अनुभवांचा वृत्तांतही नसतो. प्रत्येक लेखकाची एक जीवनदृष्टी असते. कथेतून ती डोकावत असते. सोनवणे यांचाही दृष्टीकोन त्यांच्या कथांमधून दिसून येतो. वाचकांना या कथा आवडतील अशी मला आशा आहे. प्रा. मिलिंद जोशी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परीषद, पुणे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours