‘जगणं प्रवाही असतंय म्हणायचं, आणि जमिनीच्या एका तुकड्याला बुड चिकटवून घ्यायचं!’…
पहिल्या कथेतल्या या वाक्यापासूनच हिनाच्या तिरकस, धाडसी, स्वतःला प्रश्न विचारणाऱ्या धडधडत्या मनोविश्वाची आणि तिच्या वेडगळ, हट्टी इच्छांची लख्ख कल्पना येते.
हे कथाविश्व वॉटर कलरसारखं उठावदार किंवा रम्य नाही तर, ऑईल पेंटसारखं ठाशीव आणि वास्तववादी आहे. इथे चितारलेल्या माणसांवर, प्रसंगांवर असलेले आंतरिक, शारीरिक, सामाजिक, भौतिक असे अनेक थर जाणवतात. हिनाने आजची माणसं त्यांच्या सगळ्या बारकाव्यांसह आणि कुठल्याही ‘जजमेंट’ शिवाय उभी केली आहेत. म्हणूनच, या कथा वाचून झाल्यावर मन प्रत्येक ‘स्ट्रोक’ वर रेंगाळत राहतं.
स्वप्न आणि सत्य यातला वाढता प्रवास, नकार आणि होकार यामधलं सहजी पार होणारं अंतर, भविष्य आणि भूतकाळ यांच्यातील निसटलेला सांधा, घुसमट आणि इच्छा यांमधील खोल खोल दरी, मैत्री आणि प्रेम यातला अव्यक्त गोंधळ, शील आणि शरीर याबाबत असलेला कायमचा संभ्रम, भूक आणि हाव यातला न कळणारा फरक, अशा या कथांच्या आत दडलेल्या या सगळ्या ‘थीम्स’ हिनाची संवेदनशीलता आणि निरीक्षणशक्ती, या दोन्हीच्या ताकदीची साक्ष देतात.
हिनाची भाषा, शोधक नजर, मऊसूत मन आणि तितकीच टोकदार लेखणी भविष्याचा आणखी जिवंत वेध घेईल यात शंका नाही.
– क्षितिज पटवर्धन
Pickup available at HO
Usually ready in 24 hours