प्रायोगिक मानसशास्त्रासारखा विषय शिकवताना तांत्रिक संज्ञांचा अचूक वापर आणि त्याचवेळी विषयाची रंजकता टिकवून ठेवणे ही एक कसरत असते. लेखकांनी या पुस्तकात प्रायोगिक मानसशास्त्राचा इतिहास, स्वरूप आणि नैतिकता यांसारख्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. विशेषतः संशोधनातील 'अभ्युपगम' आणि 'परिवर्त्य' या संकल्पना, लेखकांनी सुकर करून अत्यंत सुलभ भाषेत मांडल्या आहेत. प्रायोगिक नियंत्रणाची तंत्रे आणि त्यातील सूक्ष्म बारकावे ज्या पद्धतीने या पुस्तकात स्पष्ट केले आहेत, त्यावरून लेखकांची या विषयावरील पकड आणि अध्यापनाचा अनुभव लक्षात येतो. याचबरोबर अवधान, संवेदन आणि स्मृती विस्मरण या प्रक्रियांचे सिद्धांत आणि त्यांचे उपयोजन लेखकांनी अतिशय समर्पकपणे मांडले आहे. परंतु, या पुस्तकाचे खरे वेगळेपण 'मानसभौतिकी' या प्रकरणात जाणवते. भौतिक उद्दीपक आणि मानसिक संवेदना यांच्यातील संबंध मोजणाऱ्या मर्यादा पद्धती' किंवा 'स्थिर उद्दीपक पद्धती' मराठीत समजून सांगणे खरोखरच अवघड आहे. लेखकांनी या तांत्रिक संकल्पना व त्यातील गणितीय भाग इतक्या सहजतेने उलगडून दाखवला आहे की, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची या विषयाची भीती नक्कीच दूर होईल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours