गुरुवर्य प्राचार्य डॉ. प्र. श्रा. चौधरी यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल व कर्तृत्वाविषयी लिहिलेल्या लेखांचे एकत्रित स्वरूप म्हणजे ‘सहवास’ हा ग्रंथ. सरांनी आपल्या स्व-कर्तृत्त्वावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात समाजात अढळ स्थान निर्माण केले. शिक्षणातून संस्कार होतात व संस्कारांतून विचार प्रगल्भ होतात; प्रगल्भ विचारांनी समाज सुदृढ होतो, यावर सरांचा ठाम विश्वास होता. सदर ग्रंथात प्र. श्रा. चौधरी यांची सांस्कृतिक व वाङ्मयीन पार्श्वभूमी समजून घेण्यासोबतच त्यांच्यातील निर्मळ माणूसकीचे दर्शन दिसेल. एक व्यक्ती, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक व प्रगल्भ सामाजिक बांधिलकी जोपासणारे लोकशिक्षक म्हणजे सर होते. आजही सरांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत, ही विशेष बाब आहे. या पुस्तकाचा जन्म विद्यार्थ्यांच्या अंतःकरणातून आलेल्या त्या कृतज्ञ भावनेतून झाला आहे, जी अनेकदा व्यक्त होत नाही, शब्दांत मावत नाही; पण मनात मात्र आयुष्यभर उजळून राहते. आयुष्यभर सरांनी बिनचेहर्याच्या विद्यार्थ्यांना, माणसांना चेहरा दिला. त्यांच्यात स्फूर्ती पेरली; ती घट्ट सामाजिक दूरदृष्टीची व शिक्षणाची. या ग्रंथाच्या माध्यमातून चौधरी सरांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांच्या कार्याला उजाळा देणे, ही आमची आंतरिक तळमळ आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours