{"product_id":"the-mad-tibetan-by-deepti-naval-marathi","title":"THE MAD TIBETAN | द मॅड तिबेटियन  by DEEPTI NAVAL | दीप्ती नवल","description":"\u003cp\u003eकुंटणखाण्यातील वेश्या, त्यांची दलाली करणारे भडवे, त्यांच्यावर निगराणी ठेवणारी मालकीण, त्या वस्तीचा दादा आणि वासनेची आग विझवायला तिथे जाणारी सभ्य समाजातली गिर्हाईकं. सभ्यता आणि संस्कारांचे मुखवटे फाडून त्यांचं नग्न प्रदर्शन मांडणारी ही एक वेगळीच दुनिया. त्या दुनियेचं बोलणं, चालणं, वागणं—सगळंच अंगावर येणारं. रेड लाईट एरियाला भेट द्यायची असेल, तर मनाची भक्कम तयारी हवी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुंबईच्या फॉकलंड परिसरातील वेश्यावस्ती. चार जणांना घेऊन एक अँबेसिडर त्या भागात पाच-सहा चकरा मारते आणि शेवटी एका ठिकाणी थांबते. तोकडे कपडे, भडक मेकअप, तोंडात अर्वाच्य शिव्या आणि गिर्हाईकांना वेड लावणारे हावभाव करत एक तरुणी रस्त्याच्या कडेला उभी असते. अँबेसिडरचा ड्रायव्हर तिच्याकडे पाहतोय हे लक्षात येताच एक दलाल गाडीजवळ येतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“क्या मंगता है साब? बोलो ना! एकदम झकास माल देगा. तुम लोग के स्टँडर्ड का, साब!”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याचा प्रस्ताव ऐकून गाडीतल्या लोकांना काय बोलावं ते सुचत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“क्या बोलते साब? तीनों को ले लेगी! मंगता क्या?”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या वेश्येकडे बघत दलाल तिघा पुरुषांना डोळा मारतो आणि गाडीतले तिन्ही पुरुष तोंड लपवत खाली बघू लागतात. त्यापैकी एक चित्रपट दिग्दर्शक तर उरलेले दोघे अभिनेते असतात. दलालाच्या बोलण्याने ते शरमिंदा होतात, कारण ते त्या वस्तीत ‘तसल्या’ कामासाठी आलेले नसतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतेवढ्यात दलालाचं लक्ष गाडीत बसलेल्या, चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळलेल्या स्त्रीकडे जातं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“बाजू में एक धरेली है, फिर भी इधरीच घूम रहेले साले!”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याची ती शिवी त्या स्त्रीच्या जिव्हारी लागते. ती स्त्री म्हणजे अभिनेत्री दीप्ती नवल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिच्यासोबत गाडीत बसलेले पुरुष म्हणजे तिच्या ‘चिरूथा’ चित्रपटाचे दिग्दर्शक तन्वीर आणि त्या चित्रपटातील इतर सहकलाकार. एका वेश्येच्या आयुष्यात घडलेल्या, अत्यंत संवेदनशील आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनेविषयी दीप्तींनी वर्तमानपत्रात वाचलं होतं. त्या घटनेचं कात्रण त्यांनी तन्वीरला दाखवलं आणि त्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमात्र वेश्येची भूमिका साकारण्यापूर्वी प्रत्यक्ष वेश्यावस्तीत जाऊन एखाद्या वेश्येशी भेटावं, तिच्याशी संवाद साधावा आणि तिचं आयुष्य समजून घ्यावं, असं दीप्तींना वाटलं. त्यासाठीच ते चौघे पावसाच्या एका रात्री त्या वस्तीत आले होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे आणि तिथल्या काही लोकांच्या ओळखीमुळे दीप्तींना एका वेश्येच्या खोलीत प्रवेश मिळाला. तिचं नाव होतं—थुल्ली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंधारी, अतिशय छोटी खोली. उजेड नावालाच. हवा येण्यासाठी एकही खिडकी नाही. अस्वच्छ, घाणेरडी जागा. दीप्ती खोलीत पोहोचल्या तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते. थुल्ली खिडकीजवळ बसलेली होती, तर तिच्या देखरेखीखाली शरीरविक्रय करणाऱ्या नऊ स्त्रिया जमिनीवर आडव्या-तिडव्या झोपलेल्या होत्या. त्यांच्यात दहा-बारा वर्षांच्या मुलीही होत्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखोलीत दोन छोट्या खाटा होत्या. जागा इतकी अपुरी की नऊ मुली एकमेकींत हातपाय अडकवून झोपल्यावर तिथे फुटभरही जागा उरत नव्हती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eथुल्ली आणि दीप्ती यांच्यात गप्पा सुरू झाल्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“आणि… ते पुरुष आल्यावर कुठे झोपतात?” दीप्तींनी बिचकत विचारलं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“इथेच. एका वेळी दोन बेडवर दोन.”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eथुल्ली सहजपणे म्हणाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“एखाद्या कस्टमरला घाई असली, तर माझी पोरगी त्याला जिन्यातच घेते.”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“हे सगळं चालतं तेव्हा तुम्ही कुठे जाता?”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमती गुंग झालेल्या दीप्तींनी विचारलं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“कुठं जाणार? इथंच असतो. एखादी बाई खाटेवर गिर्हाईक घेत असली, तर त्याच खाटेखाली दुसरी पोरगी खेळत असते.”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“काय?”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदीप्तींनी तिला मध्येच थांबवलं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“तुम्हाला ‘ते’ आवाज ऐकू येत नाहीत का?”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“सगळे आवाज येतात. त्यांचं आरडणं, ओरडणं, चित्कार, घाण बोलणं… आम्हाला त्याची सवय झाली आहे.”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकान बंद करावेत, डोळे झाकावेत आणि तिथून पळून जावं असं दीप्तींना वाटलं. वेश्येच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या दीप्ती प्रचंड अस्वस्थ झाल्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअभिनेत्री होण्यासाठी त्या अमेरिका सोडून मुंबईत आल्या होत्या. थुल्लीलाही कधीतरी कुणीतरी “तू सुंदर आहेस, चित्रपटात काम देतो,” असं सांगून मुंबईत आणलं होतं. दोघीही कामाच्या शोधात मुंबईत आलेल्या स्त्रिया; पण त्यांच्या आयुष्यांचे मार्ग किती वेगळे निघाले होते!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक स्त्री म्हणून दीप्तींना थुल्लीची कहाणी ऐकवत नव्हती, पण त्याच वेळी त्यांच्यातील अभिनेत्रीचं त्या जगाविषयीचं कुतूहल वाढत होतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपहाटेचे चार वाजले आणि खाली गोंधळ सुरू झाला. कुंटणखाण्याचा दादा जिना चढत वर येत होता. “इथे येणाऱ्या प्रत्येक नव्या स्त्रीचा उपभोग घेण्याचा पहिला हक्क माझाच,” असं मानणारा तो दादा खोलीत आल्यावर काय होईल, याची दीप्तींना कल्पना नव्हती…\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45685357740115,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61euff5wEVL._SL1360_-2.jpg?v=1781078263","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/the-mad-tibetan-by-deepti-naval-marathi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}