'वास्तवाचा विस्तव' या अन्यर्थक शीर्षकाचा कवी नरेंद्र बापूजी खैरनार यांचा ललित लेख संग्रह ललित निबंध या या. मय प्रकारात आगळीवेगळी भर टाकणारा आहे. ललित लेख या प्रकाराचा पूर्वावतार म्हणजे लघु निबंध हा होय. वि.स. खांडेकर, ना. सी. फडके वगैरेंनी जे लघु निबंध लिहिले ती परंपरा अनंत काणेकर, गो. वि. करंदीकर, श्रीनिवास विनायक कुलकर्णी प्रभूतनी चालवली. एखाद्या हलक्या फुलक्या विषयाभोवती मनाने रुंजी घालून आल्हाददायक शैलीत आपल्याला अविष्कृत करायचे. असे त्याचे सर्वसाधारण स्वरूप होते. त्यात सामाजिक सांस्कृतिक विषय आल्यानंतर त्याच्यात वैचारिक चिंतनाचा प्रवेश झाला व त्याची लालित्यपूर्ण शैलीत अभिव्यक्ती होऊ लागली. याच कालक्रमात त्याला ललित निबंध हे नाव पडले. या प्रकारच्या निबंध लेखकांत इरावती कर्वे, दुर्गा भागवत, अनिल अवचट यांचा समावेश होतो. 'वास्तवाचा विस्तव' मधील निबंधाला ललित निबंध म्हणता येईल. ते आगळे वेगळे आहेत. कसे ? तर त्यांची मांडणी कादंबरीत शोभावी अशी आहे. इथे प्रमुख दोन पात्रे आहेत शिक्षक व विद्यार्थी! या निबंधामध्ये चर्चा होते ती प्रा. पाटील व विविध विद्यार्थी या प्रमुख पात्रांमध्ये. ही चर्चा वर्गात किंवा कॉलेज कट्ट्यावर होते. प्रा पाटील कधी वर्गात प्रश्न उपस्थित करून मुलांची मते ऐकतात, चर्चेला वळण देतात, योग्य तो बोध करून देतात, तर कधी ते कॉलेज कट्ट्यावरील मुलांच्या चर्चेत सहभागी होतात. मुलांच्या चमकदार मतांनी चकित होऊन स्वतः ही बोध घेतात. चर्चेचा समारोप झाल्यावर प्रा. पाटील हे कवी असल्यामुळे त्यांच्याच कवितेतील ओळी त्यांना स्मरतात व त्यांना होणारा बोध टोकदार होतो. म्हणजे या निबंधांना कादंबरी प्रमाणेच काव्याचेही परिमाण लाभले आहे. त्यामुळे या संग्रहाने आगळीवेगळी पण मूल्यवान भर घातल्याचे प्रारंभीच नमूद केले आहे. या संग्रहातील ३५ लेखात विविध विषय आले आहेत. लोकशाही, पैसा श्रेष्ठ की शिक्षण ?, न्यायव्यवस्था, घटस्फोट, वृद्धावस्था, सोशल मीडिया वगैरे कितीतरी विषय आहेत व त्यांच्या पोटात प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न जळजळीत वास्तवावर आधारित आहेत. यामुळे वास्तवाला लावलेले विस्तव हे विशेषण सार्थ आहे. ललित निबंधात लेखकाचे सुजाण मन मुक्तपणे प्रकटत असते. या लेखांमध्ये दिसणारे डॉ. नरेंद्र खैरनार यांचे मन विचारशील, संवेदनशील, सामाजिक प्रश्नांबद्दल अगत्यशील असल्याचे कळते. यामुळेच या निबंधातील चर्चेला रंजकता आणि उद्बोधकता अशी उभयविध मूल्ये प्राप्त झाली आहेत. हा संग्रह मुळातून वाचल्यावर वाचकांचे मोठे प्रबोधन होईल ही खात्री बाळगतो.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours