आपल्या वयाच्या चाळीसाव्या वाढदिवशी ती अर्जेंटिनातील ‘उशुआईआ’ — जगाच्या अंतिम टोकावरचे शहर — इथे जाण्याचा निर्णय घेते.. एकाएकी.. आणि तिथे जातेही. इस्तंबूल ते उशुआईआ… याआधी साधा बसचाही प्रवास फारसा न केलेली अशी ती; पण एके दिवशी पूर्ण तयारीनिशी आपली सूटकेस उचलते, अवघा विमानप्रवास करून उशुआईआला पोहोचते, मुक्कामाची जागा आणि स्वतःच्या उदरनिर्वाहापुरतं काम मिळवते आणि.. तिच्या अनपेक्षित निर्णयांसारखं कोविड-१९ या अनपेक्षित महामारीमुळे अख्खं जग थांबतं आणि तिने आखलेल्या पुढल्या प्रवासाचा बेतही स्थगित होतो.
तिचा सभोवताल जरी आता या महामारीच्या विळख्यात घेरलेला असला; तरी तिच्या अंतर्गत तिच्या भूतकाळाचा प्रवास मात्र सुरू होतो. लहान-लहान, पण आखीव प्रकरणांतून तिच्या आयुष्याची चाळीस वर्षे आपल्यासमोर उलगडत जातात — वेळेच्या सरळ रेषेत नाही, तर आठवणींच्या तुटक, तरंगत्या प्रवाहात.
ही नायिका निनामी आणि तिच्या आयुष्यातील पात्रेही निनामीच. अपवाद केवळ मिगेलचा!.. तिचा हा निनामी भवताल सुरुवातीला एखाद्या सर्वसामान्य स्त्रीच्या भावविश्वासारखाच भासत असला, तरी तिच्या मनात दडलेली जिज्ञासा, तिने न बोलता केलेला प्रतिकार आणि जगाकडे पाहण्याची तिची स्वतंत्र दृष्टी हळूहळू तिला तिची खास ओळख देतात..
तिच्या चाळीस वर्षांचं तिने व्यतीत केलेलं आयुष्य वाचताना एक गोष्ट मात्र वाचकांच्या मनात कोरली जाते — ती ‘वेगळी’ आहे.. वेगळीच आहे…
Pickup available at HO
Usually ready in 24 hours