जॉन ग्रे यांनी स्त्री आणि पुरुषांना अनुक्रमे ‘व्हीनस’ आणि ‘मार्स’ची रूपकं देत त्यांच्या स्वभावातील, भावविश्वातील आणि नातेसंबंधांतील मूलभूत फरकांचा वेध घेतला आहे. विषय आहे संघर्षाचा; पण ग्रे यांची खेळकर, मिश्कील शैली हा गंभीर विषयही सहज, रंजक आणि तितकाच अंतर्मुख करणारा बनवते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढता ताण, गुंतागुंतीची जीवनशैली आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे संवादाचा अभाव यांमुळे स्त्री-पुरुषांचं सहजीवन अनेकदा तणावाचं बनतं. आपल्या चित्तवृत्ती, भावनिक प्रतिक्रिया आणि वर्तनावर टेस्टोस्टेरॉन, ऑक्सिटोसीन यांसारख्या संप्रेरकांचा होणारा परिणाम ग्रे सोप्या भाषेत उलगडून सांगतात. ताणतणाव कमी करण्यासाठी आहार-विहारापासून आचार-विचारांपर्यंत कोणते बदल उपयोगी ठरू शकतात, याचंही ते मार्गदर्शन करतात.
वाद सुरू होण्यापूर्वीचे संकेत कसे ओळखायचे? भांडणाच्या वेळी काय टाळायचं? परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी थोडी ‘विश्रांती’ कशी घ्यायची? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, नातं सुधारण्यासाठी नेमका बदल कुणी आणि कुठे करायचा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक व्यावहारिक उदाहरणं आणि उपयुक्त टिप्सच्या माध्यमातून देतं.
एका जोडीदाराने केवळ आपला दृष्टिकोन बदलला, तरी नात्यात किती मोठा फरक पडू शकतो, हे जॉन ग्रे प्रभावीपणे दाखवून देतात. गरज भासल्यास समुपदेशकाची मदत घेण्याचं महत्त्वही ते अधोरेखित करतात.
स्त्री-पुरुषांच्या नात्यातील ‘कलह’ समजून घेऊन त्यामागची कारणं शोधणं, संवादाची नवी दारं उघडणं आणि सहजीवन अधिक समंजस, आनंदी आणि सुसंवादी करणं—यासाठी मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours