चिं० त्र्यं० खानोलकरांचे निधन झाले. काही दिवसांनी श्री० पु० भागवत यांचा फोन आला, "खानोलकरांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांच्या असग्रहित कवितांचा संग्रह प्रकाशित करायचा आहे. या वेळी निवड न करता सरसकट कविता घ्यायच्या. तुम्ही मुद्रणप्रत तयार कराल का?" मी होकार दिला; पण एक शंका विचारली, "जोगवा कालखंडातील असंग्रहित, अप्रकाशित कवितांचं काय?" श्रीपुंचे उत्तर, "त्या जोगवाच्या पुनर्मुद्रणाच्या वेळी परिशिष्टात टाकू." मी कामाला लागलो. मी केलेल्या खानोलकरांच्या साहित्य-सूचीवरून असंग्रहित कवितांची यादी केली. त्या यादीमधून जोगवा कालखंडातील कविता बाजूला केल्या. कवितासंग्रहात घ्यायच्या कवितांची यादी केली. उपलब्ध असलेल्या ऑफ प्रिंट्स असलेल्या कविता कागदावर डकवल्या. ऑफ प्रिंट्स नसलेल्या कविता हस्तलिखितांवरून उतरून काढल्या. उपलब्ध होऊ न शकलेल्या कविता नायगावच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात जाऊन उतरून काढल्या. पुढील शोधनाचे काम सोपे व्हावे म्हणून प्रत्येक कवितेच्या खाली नियतकालिकाचे नाव, महिना, वर्ष नमूद केले. कविता कालक्रमानुसार लावल्या. मुद्रणप्रत तयार झाल्यानंतर श्रीपुंच्या हवाली केली. - पण पुढे खानोलकरांच्या उपलब्ध नसलेल्या पुस्तकांचे पुनर्मुद्रण करायचे ठरले कवितासंग्रह मागे राहिला. खानोलकरांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कवितासंग्रह प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे. - जया दडकर
Pickup available at HO
Usually ready in 24 hours