आपल्या जगण्या-भोगण्याची तन्हा उत्कटपणे शब्दांतून व्यक्त करण्यासाठी कवितेइतके समर्थ माध्यम दुसरे नाही. कविता ही व्यक्तिगत भावविश्वाच्या अनेकानेक कंगोरे सोबत घेऊन येतानाच व्यक्ती ज्या समूहजीवनाचा, सामाजिक स्तराचा एक भाग म्हणून जगत आहे त्या समूहाच्या सुखदु:खालाही अभिव्यक्त करीत असते. धर्म, वर्ग, जात यांच्या सुरक्षित भासणाऱ्या छत्रछायेखाली दीर्घकाळापासून सुरळीतपणे सुरू असलेल्या पारंपरिक समूहजीवनाची घडी आधुनिकीकरणाच्या गतिमान चक्रामुळे आणि त्यातून प्रसारित झालेल्या समता, बंधुता, न्याय या तत्त्वांवर प्रा. रमेश राठोड आधारित मानवता प्रस्थापनेच्या विश्वमानामुळे अधिकाधिक मानवकेंद्री होत गेली. हे विश्वमान पारंपरिक समूहजीवनाच्या तळागाळांतील समाजघटकांपर्यंत कितपत पोहचले ? हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. परंतु त्यातून गावगाड्याच्या चरकात भरडल्या गेलेल्या समाजघटकांच्या व्यवस्थाशरण जगण्यापर्यंत माणूसपणाचा उजेड थोडाफार का होईना पोहचण्याची आशा निर्माण झाली. या अंगाने घडत गेलेल्या आपल्या गाडीलोहार समाजाच्या स्थित्यंतराची नानाविध रूपे रमेश राठोड यांच्या 'बैलगाडू' या संग्रहातील कवितांतून प्रत्ययास येतात. शिक्षण, नोकरी या मार्गाने जीवन उन्नत करू पाहणाऱ्या नव्या पिढीचा शहराकडे, आधुनिक जीवनशैलीकडे वाढता कल आणि जागतिकीकरणाच्या विस्तारित अवकाशामुळे पारंपरिक लोहार कामाला लागलेली ओहटी यांमुळे बदलत गेलेले समाजवास्तव काव्यात्म रीतीने या रचनांमधून आलेले आहे. आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग असलेली लोहारी बोली (जी धेडगुजरी भाषा म्हणूनही ओळखली जाते.) कवितेची भाषा म्हणून उपयोजून तिला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे, समृध्द करण्याचे काम या कवितासंग्रहाने स्वाभाविकपणे केले आहे. या बोलीभाषेतील अनेक शब्द, शब्दरूपे या संग्रहातील कवितांतून प्रतिमा-प्रतीके बनून आलेली आहेत. संग्रहातील कवितांची शीर्षके जरी वाचलीत तरी याची कल्पना येते. आपल्या समाजपरिघातील जीवनवास्तवाचे सूक्ष्म निरीक्षण, प्राप्त विश्वमानातून त्याचे करून घेतलेले आकलन आणि त्याला शब्दबध्द करताना जीवनानुभवाला काव्यानुभवात रूपांतरित करण्यासाठी अनिवार्य असलेल्या कवित्वाचे बाळगलेले भान यांमुळे रमेश राठोड यांचा हा कवितासंग्रह लक्षवेधक ठरला आहे. समाजभाषाविज्ञानाच्या अंगाने चिकित्सा करण्यासाठी उपलब्ध असा हा एक काव्यात्म दस्तऐवज आहे. -आशुतोष पाटील
Pickup available at HO
Usually ready in 24 hours