'बरेच काही उगवून आलेले...' हा द० भा० धामणस्कर यांचा दुसरा कवितासंग्रह.
'प्राक्तनाचे संदर्भ' या पहिल्याच कवितासंग्रहाने द० भा० धामणस्करांची कविता एकूण मराठी कवितेत सुप्रतिष्ठित झाली आणि तिचे स्वत्व आणि सत्त्व विचक्षण वाचकांना मोहवून गेले.
निसर्ग हा धामणस्करांच्या कवितेतून श्वासोच्छ्वासासारखा वाहतो. निसर्गाची विविध रूपे-रंग-आकार तदाकार होऊन अनुभवताना धामणस्करांची कविता डवरून येते. निसगनि उत्पत्ति-स्थिति-लय या सनातन तत्त्वाचा किती नैसर्गिक रीत्या स्वीकार केला आहे हे पाहून ती अंतर्मुख होते. आपल्या रक्तातील आकाश झाड-पक्ष्यांचा हा उमाळा पुढच्या पिढीत संक्रमित झालेला पाहून ती मनोमन आनंदते. या पार्श्वभूमीवर माणसातील हिंसा, क्रौर्य, कृतज्ञतेचा अभाव, असामंजस्य या तमोगुणांची विखारी पैदास पाहून ती व्यथित होते. कायमची रात्र असलेल्या प्रदेशातील अभागी मुले पाहून सभोवताली जमलेल्या नामुष्कीच्या अंधाराच्या जाणिवेने ती करुणार्त होते. "तूच 'हो' म्हटल्यामुळे एक मूल इथं आलंय त्याला 'नाही' कधीच ऐकू येणार नाही एवढी व्यवस्था तुला केलीच पाहिजे" असे साकडे ती गरिबाघरी जन्मलेल्या बाळासाठी परमेश्वराला घालते.
कविता ही साधना मानणारे धामणस्कर जे० कृष्णमूर्तीना विनंती करतात :
आमच्या निद्राधीन मूढतेवर तुझा.
करुणामय पहारा ठेव.
विचार अधूनमधून, "जागे आहांत ना?...
ऐकताय ना?..."-कितीएक संतमहंतांना
पुरून उरलेले सनातन आम्ही, म्हणून
ही विनंती...
Pickup available at HO
Usually ready in 24 hours