विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा भारतीय समाजात विविध विचारसरणींचे मंथन घडवणारा काळ होता. भारतीयत्वाचा शोध, जागतिक राजकारणातील उलथापालथी आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी यांमुळे समाजमन ढवळून निघत होते. वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाबरोबरच वैदिकेतर धर्मांचा नव्याने शोध घेण्याची आणि त्यांची पुनर्मांडणी करण्याची ओढ अभ्यासकांमध्ये निर्माण झाली होती. भारतात पोहोचलेले मार्क्सवादी विचार आणि आनंद कुमारस्वामी, डेव्हिस, धर्मानंद कोसंबी यांसारख्या विद्वानांनी केलेला बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास यांनी या वैचारिक वातावरणाला आकार दिला. याच पार्श्वभूमीवर प. ल. वैद्य यांचा ‘बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार’ हा छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण ग्रंथ साकारला.
‘इचलकरंजी व्याख्यानमाले’तील व्याख्यानांवर आधारित हा ग्रंथ १९२६ साली प्रकाशित झाला. तेव्हापासून मराठी वाचक आणि अभ्यासकांसाठी तो एक वाचनसुलभ संदर्भग्रंथ ठरला आहे. बुद्धपूर्व काळातील धर्ममते आणि त्यांचे वर्गीकरण, बौद्ध धर्माचे नीतिप्रधान स्वरूप, गौतम बुद्धांचे जीवन आणि त्यांच्या जीवनाभोवती गुंफलेल्या मिथककथा यांचा वेध या पुस्तकात घेतला आहे. बुद्धोत्तर काळातील पंथोपपंथांचा विस्तार, महायान व हीनयान, त्रिपिटक आणि देशज भाषांचे स्थान यांचीही विवेचक मांडणी यात आढळते. ब्रह्मदेश, तिबेट, जावा-सुमात्रा यांपासून चीन आणि जपानपर्यंत झालेल्या बौद्ध धर्माच्या प्रसाराचा व्यापक पट हा ग्रंथ उलगडतो.
संदर्भसमृद्धता आणि सुगम भाषा ही या पुस्तकाची विशेष बलस्थाने आहेत. शतकभरापूर्वी लिहिलेला असूनही त्यातील मराठी आजच्या वाचकाला क्लिष्ट वाटत नाही. बौद्ध धर्माचा उदय, विचार आणि विस्तार समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा ग्रंथ मोलाचा ठरतो.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours