विनोद जीवनतारे यांची कथा ही पूर्व महाराष्ट्रातील माणसाची आहे. नाग विदर्भातील समाज जीवनातील लोकांची आहे. जी काही मनात भावभावना रुजते ती जशीच्या तशीच व्यक्त होणारी ही माणसं आहेत. त्यांना जीवन जगत असताना ज्या अडचणी येतात, आर्थिक समस्या येतात त्या समस्या सोडवायची जी पद्धत आहे ती लेखकाने अनुभवली आणि तिला कथारूप दिले. सामान्य माणसाचे हे जीवन जगणे कुणाला आवडो न आवडो ते सरळ सरळ व्यक्त होतात. त्यांच्या जगण्यावागण्यात चूक आहे की बरोबर आहे असा काहीही विचार न करता आपल्या परिस्थितीवर मात करणे हा स्वभावधर्म लेखकाने कथानकात ओवला आहे. सभोवतालच्या मानवी समाजात सर्वच प्रकारच्या स्वभावाची माणसं असतात. परंतु काही माणसं त्यांच्या चांगुलपणामुळे व काही माणसं त्यांच्या विचित्र वागण्यामुळे नजरेत भरतात. लेखकाला अशा प्रवृत्तीची माणसं चटकन दिसतात, तथा स्वतःचे जीवन जगत असताना त्यांना ते कोणत्यातरी रूपाने भेटतात. अशी अनेक माणसं जीवनतारे या लेखकाला भेटली आणि त्यांनी त्यांच्या वागण्याला कथारूप दिले. विनोद जीवनतारे या कथाकाराने 'माणुसकी हरवलेली माणसं' या कथासंग्रहात सभोवतालच्या व्यक्तिरेखा जिवंत रेखाटल्या आहेत. त्यांच्या अंगी असलेल्या सगुण दुर्गुणाचे स्पष्ट शब्दात चित्रण केले आहे. या कथेतील पात्र ज्या प्रदेशातील आहेत, त्या प्रदेशातील बोलीभाषेतील शब्द कथेत वापरली आहेत. पवनी, भंडारा, नागपूर इथे वास्तव्य करणाऱ्या माणसाचे जीवन उलगडून दाखविले आहे. डॉ. प्रकाश खरात
Pickup available at HO
Usually ready in 24 hours