लाखो लोकांमध्ये ‘पीपल बाबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी प्रेम परिवर्तन यांच्या आयुष्याचा, पर्यावरणप्रेमाचा आणि एका विलक्षण चळवळीचा प्रवास सांगणारं आत्मीय पुस्तक म्हणजे ‘पिंपळांवरची भुतं’.
डायऱ्या, नॅपकिन, वर्तमानपत्रांच्या कडा आणि पाठकोऱ्या कागदांवर वर्षानुवर्षे लिहिलेल्या पीपल बाबांच्या हस्तलिखित नोंदींमधून या पुस्तकाचा जन्म झाला आहे. डेहराडूनमधलं बालपण, पुण्यातल्या हिरव्यागार कॅन्टोन्मेंटमधले दिवस, आजीच्या गोष्टी आणि प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने मनात रुजवलेलं निसर्गाविषयीचं कुतूहल, या आठवणींतून त्यांच्या पर्यावरणप्रेमाची मुळं उलगडत जातात. आजी सांगत असलेल्या ‘झाडांवरच्या भुतां’च्या गोष्टी प्रत्यक्षात श्रद्धेच्या माध्यमातून जंगलं आणि झाडं जपण्याची भारतीय परंपरा सांगणाऱ्या होत्या, याची जाणीव त्यांना पुढे भारतभर फिरताना झाली.
वयाच्या अकराव्या वर्षी झाडं लावायला सुरुवात करणाऱ्या पीपल बाबांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतातील २१ राज्यांतील २२६ जिल्ह्यांमध्ये २.६ कोटींहून अधिक झाडं लावली आणि त्यांचं संवर्धन केलं आहे. २०११ मध्ये त्यांनी स्थापन केलेली ‘गिव्ह मी ट्रीज’ ही संस्था आज पर्यावरण आणि अधिवास संवर्धनासाठी व्यापक स्तरावर कार्यरत आहे.
ओशोंच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘निओ-संन्यास चळवळी’त सहभागी झाले आणि तिथेच त्यांना ‘स्वामी प्रेम परिवर्तन’ हे नाव मिळालं. आज सोशल मीडियावरील लाखो अनुयायांपर्यंत ते पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचवत आहेत.
‘पिंपळांवरची भुतं’ हे केवळ एका पर्यावरण कार्यकर्त्याचं आत्मकथन नाही; माती, झाडं आणि माणूस यांच्यातल्या नात्याची नव्याने आठवण करून देणारं संवेदनशील पुस्तक आहे. पृथ्वीची स्पंदनं, पानांच्या सळसळीतील काव्य आणि झाडाच्या सावलीतलं प्रेम आपल्याला आधीपासूनच परिचित आहे, आपण फक्त त्याचं स्मरण पुन्हा जागं करायचं आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours