"मला कायम आठवतो तो १९७२ मध्ये भेटलेला शिवाजी !
बेळगावजवळ असलेल्या कडोली या छोट्याशा गावात १९७२ साली 'तरुण शांतिसेना' या संघटनेचे राष्ट्रीय शिबिर झाले. शिबिर अनुभवणं, जगणं हे सद्भाग्य असतं. ते सद्भाग्य शिवाजी व मी एकत्र अनुभवलं. शिबिरात त्याला जवळून पाहिल्यावर स्व. दादा धर्माधिकारी म्हणाले- "याला पाहिल्यावर मला साने गुरुजींची आठवण येते. याला जपा."
खेड्यातला एका अतिसामान्य घरातला हा मुलगा. त्याच्या जीवनाला आदर्शाचा स्पर्श झाला; गांधी-विनोबांचा, सर्वोदय विचाराचा, सदाशिवराव भोसलेसारख्या समाजसेवकांचा व 'तरुण शांतिसेने'च्या रूपात समवयीन तरुणांचा ! त्यातून त्याने आजन्म देशाची सेवा करण्याचा संकल्प केला. त्या दिवशी एका सामाजिक कार्यकर्त्याचा जन्म झाला !
आत्मचरित्राचा मुख्य भाग शिवाजीने केलेल्या विविध प्रयत्नांची कहाणी आहे. विनोबांच्या ग्रामस्वराज्याचा विचार प्रत्यक्ष गावा-गावांत उतरवण्यासाठी त्याने अनेक गोष्टी केल्या. ही कामे पूर्वनियोजित प्रकल्पाचा भाग नव्हती. हा शिवाजीचा जीवन-प्रकल्प होता. त्याची ही कहाणी.
वाचता वाचता शिवाजीचं आत्मचरित्र नकळत आपलं आत्मचरित्र व्हायला लागतं. याचं श्रेय त्याच्या सत्य व प्रांजळ अनुभव कथनाला आहे. त्यात श्रेयाची प्रौढी नाही, अपयश झाकण्याचा प्रयत्न नाही, स्व-समर्थनाची धडपड नाही. जे घडलं ते असं होतं. शिवाजीचं आत्मचरित्र व्यक्तीच्या सीमा ओलांडून एका पिढीच्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रातिनिधिक आत्मकथन बनायला लागतं.
स्वातंत्र्यानंतरच्या हजारो मूक, निःस्वार्थ गांधीवादी कार्यकर्त्यांची ती कहाणी बनते !
-डॉ. अभय बंग
Pickup available at HO
Usually ready in 24 hours