महाराष्ट्राच्या भूमीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे, 'श्रीक्षेत्र औंढा नागनाथ'. या देवालयाचा इतिहास हा केवळ वास्तुकलेचा विलोभनीय आविष्कार नाही, तर तो भारतीय संस्कृतीच्या एका वैभवशाली कालखंडाचा जिवंत दस्तऐवज आहे. प्रस्तुत ग्रंथ या प्राचीन शिवालयाच्या भव्य स्थापत्याचा, सहस्र वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेचा आणि त्यावरील अद्वितीय शिल्पवैभवाचा एक समग्र मागोवा घेतो.
हे केवळ मूर्तीशास्त्र सांगणारे पुस्तक नसून, त्याही पलीकडे जाऊन मूर्तीच्या अनुबंधातून उलगडणारे मूर्तीविज्ञान मांडणारा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. प्राचीन काळातील 'आमर्दक मठ' हे केवळ धार्मिक केंद्र नसून ते 'सिद्धान्तशैव' तत्त्वज्ञानाचे प्रमुख स्थान कसे होते, याचा उलगडा ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट आणि शैवाआगम ग्रंथांच्या आधारे लेखिकेने केला आहे.
भौगोलिक अनुसंधान, राजकीय स्थित्यंतरे आणि आगम परंपरेतील 'पञ्चावरण' पद्धती अशा विविध पैलूंना स्पर्श करणारे हे संशोधन, औंढा नागनाथ मंदिराला महाराष्ट्रातील 'शैवागम' परंपरेचा एक जिवंत आणि भौतिक पुरावा म्हणून प्रस्थापित करते.
जिज्ञासू वाचक, इतिहासाचे अभ्यासक आणि मंदिर संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा ग्रंथ म्हणजे प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचवणारा शब्दानुबंध आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours