व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ वस्तुनिष्ठेतेची बूज इमानेइतबारे राखणारे अजीम नवाज राही यांचे हे चार कवितासंग्रह. या सशक्त कवितासंग्रहांनी अजीम नवाज राही यांचं नाव सकसनिर्मितीच्या जमिनीत खोलवर रुजवलं हे निर्विवाद. “वळीवाच्या वेळा” हा त्यांचा पाचवा कवितासंग्रह.... “वळीवाच्या वेळा” म्हणजे समकालीन समाजमनाचं लख्ख प्रतिबिंब.विद्यमान आव्हानांशी थेट भिडतांना ही कविता आक्रस्ताळी वा कंठाळी होत नाही. अत्यंत संयतपणानं काळजात झिरपते. धर्म, जात, पंथांच्या तटबंदीत न अडकता माणसांची निखळ काळजी वाहते. वास्तवाचा, सकसतेचा, प्रयोगशीलतेचा ध्यास असलेली ही कविता भाषिकअंगाने, अनुभवांच्या अंगाने अगदी समृद्ध... गाव, गावमाती, गावमातीतील माणसं, मोहल्ला, मोहल्याला लगडलेल्या सर्वधर्मीय भोवतालाशी “वळीवाच्या वेळा” मधली कविता समरसून गेलेली. जाणिवा आणि आविष्काराच्या पातळीवरची प्रयोगशीलता कवितागणिक नवी होत गेलेली समकालीन, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, परिप्रेक्ष्याचे अनेक पदर उलगडत ती तटस्थपणे भाष्य करत पुढे सरकत जाते. यापूर्वीच्या कवितासंग्रहांपेक्षा “वळीवाच्या वेळा” मधली कविता भाषा, अनुभव, चिंतन अन् मांडणीच्या अंगाने पुढचा टप्पा गाठणारी, समग्र चिंतीत वर्तमान कवेत घेणारी आहे. - प्रा. डॉ. मिलींद बागुल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours